येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार : अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे – खासदार बजरंग सोनवणे

खासदार बजरंग सोनवणे यांचे येडेश्वरी कारखाना परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन 

टीम AM : मला घडवण्यामध्ये अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे. 1999 पासून त्यांचा माझा संबंध आला. अजित दादा माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे, देश दुःखात आहे. हा सर्व नियतीचा खेळ आहे. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत. या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल. बीड जिल्ह्यात नसेल, असं स्मारक उभारणार आहोत. एका वर्षात स्मारक बांधून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार आहोत. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना आता खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील नवी शंका उपस्थित केलीय. बजरंग सोनवणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे असं सोनवणेंनी म्हटलंय. दमानियांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाची चौकशी झाली पाहिजे. विमानात 6 लोक होते तर 5 बॉड्या कशा सापडल्या ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवार घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी भाष्य करणार नाही, कारण आज ती वेळ नाही. दादा मला हेलिकॉप्टरमध्ये काय बोलले हे मी आज सांगणार नाही. पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये, असं आम्ही काम करणार आहोत. आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. दहा दिवस दुखवटा असल्याने मी माध्यमांशी बोललो नाही. दादांचा आम्हाला मोरल सपोर्ट होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही ? हे सांगता येत नाही. राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या बैठकीला मी नव्हतो. बीडहून संभाजीनगर आणि तिथून आम्ही सोबत प्लेनने पुण्याला गेलो होतो. ज्या माणसावर आम्ही परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम केले तो आता निघून गेला. मी सुनेत्रा पवारांच्या शपथविधी बाबत बोलणार नाही. पवार साहेब प्रमुख होते, आहेत आणि राहतील, असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले. 

बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात 6 लोक होते, मग 5 बॉडी कशा सापडल्या ? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का ? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. वर विमान ब्लास्ट का झाले ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. खासदार बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी कारखाना परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह आदींची ‌प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here