टीम AM : तामिळनाडूच्या येलागिरी टेकड्यांतील आदिवासी वस्तीमध्ये आजही शाळा आणि रस्त्यांचा अभाव आहे. शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी जिथे पायवाटाही नाही, अशा ठिकाणी जन्मलेल्या श्रीपती यांनी अवघ्या 23 व्या वर्षी इतिहास घडवला आहे. त्या आपल्या आदिवासी समाजातील पहिल्या सिव्हिल न्यायाधीश ठरल्या आहेत.
चांगल्या आयुष्याच्या शोधात त्यांचे कुटुंब पुलियूरहून अथनावूर येथे स्थलांतरित झाले. वडील शेतकरी, आई घरकाम व इतरांच्या घरात काम करून कुटुंबाचा गाडा ओढत होत्या. अडचणी असंख्य असतानाही आई – वडिलांनी मुलांच्या शिक्षणावर कधीही आड येऊ दिली नाही.
शालेय शिक्षणानंतर श्रीपती यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि डॉ. आंबेडकर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच काळात त्यांचे लग्न झाले. सासरी गेल्यानंतरही शिक्षण थांबवले नाही. सिव्हिल न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी त्या 200 किलोमीटर दूर चेन्नईला पोहोचल्या, तेव्हा परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी मुलाला जन्म दिला होता. वेदना, थकवा आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखालीही त्यांनी परीक्षा दिली. निकाल जाहीर झाला, तेव्हा ती केवळ नोकरी नव्हती. तो त्यांच्या संपूर्ण समाजासाठी लिहिला गेलेला इतिहास होता. आज श्रीपती केवळ सिव्हिल न्यायाधीश नाहीत, त्या – त्या लेकींचा आवाज आहेत, ज्यांच्या स्वप्नांपर्यंत आजही रस्ते पोहोचलेले नाहीत.



