विभागप्रमुख डॉ. गणेश तोंडगे यांची माहिती : सर्व स्तरांतून होतंय कौतुक
टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागाने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या एका वर्षात या विभागामार्फत तब्बल 16 हजार 640 शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या असून ग्रामीण भागातील महिलांसाठी ही मोठी आरोग्यक्रांती ठरली आहे.
विभागप्रमुख डॉ. गणेश तोंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सिझेरियन, गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया, गाठ काढण्याच्या शस्त्रक्रिया तसेच इतर गुंतागुंतीच्या स्त्रीरोगविषयक उपचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. सन 2025 मध्ये विभागाने नार्मल प्रसुती 6287 तसेच सिझेरियन प्रसुती 6758, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 1654, गर्भपात शस्त्रक्रिया 1035, गर्भपिशवी काढणे शस्त्रक्रिया 276 यासह इतर महत्वाच्या शस्त्रक्रिया विभागात पार पडल्या असून सर्व मिळून 16 हजार 640 शस्त्रक्रिया प्रसुती विभागाने पुर्ण केल्या आहेत.
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टरांची टीम, तसेच 24 तास कार्यरत असलेली आपत्कालीन सेवा यामुळे रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळू शकले. ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या गरोदर महिलांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरत असून, मातामृत्यू व नवजात बालक मृत्यूदर कमी करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.
‘महिलांच्या आरोग्यासाठी आम्ही दर्जेदार व सुरक्षित उपचार देण्यावर भर देत आहोत. रुग्णांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळेच हा टप्पा गाठता आला, ‘असे मत डॉ. गणेश तोंडगे यांनी व्यक्त केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचा स्त्रीरोग व प्रसूती विभाग संपूर्ण मराठवाड्यात आदर्श ठरत आहे. प्रसूती विभागाच्या या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
24 आठवड्यानंतरचे कायदेशीर गर्भपात शक्य : डॉ. तोंडगे
24 आठवड्यानंतरचे कायदेशीर गर्भपात शक्य असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. गणेश तोंडगे यांनी दिली आहे. तसेच 2021 च्या ‘एमटीपी’ कायद्याच्या बदलानुसार यापुढे 24 आठवड्यानंतर सुध्दा बाळाच्या व्यंगासाठी व आईच्या जीवाला धोका असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक नाही. अश्या केसेसमध्ये ‘स्वाराती’ रुग्णालयातचं वैद्यकीय मंडळ स्थापन असून कायद्याने मंडळालाच योग्य निर्णय घेऊन 24 आठवड्यानंतरचे गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. गणेश तोंडगे यांनी केले आहे.



