टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारात शुक्रवारी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना दहा टायर ट्रकच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. या आगीत शेतकरी पार्थ उत्तम सोळंके यांचा काढणीला आलेला चार एकर ऊस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेत सुमारे सात लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात ऊस तोडणी सुरू असताना ट्रक चालकाने गाडी सुरू करण्यासाठी सेल्फ मारताच बॅटरीत स्पार्किंग होऊन ठिणग्या उडाल्या. त्यातून आगीचा भडका उडताच ट्रक आणि शेतातील उभा ऊस आगीच्या विळख्यात सापडला. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठे नुकसान टाळता आले नाही. या घटनेनंतर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.



