अंबाजोगाई शहरातील विविध गंभीर नागरी प्रश्नांबाबत लोकविकास महाआघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

टीम AM : लोकविकास महाआघाडीच्या वतीने आज नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांना शहरातील विविध गंभीर नागरी प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. शहरात स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

शहरातील रस्ते, नाल्या व सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून घंटागाड्या नियमित व नियोजनबद्ध फिरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. अनेक भागातील बंद पथदिवे तात्काळ दुरुस्त करून बसवावेत तसेच नगरपरिषद कर्मचारी व कंत्राटी कामगारांचे पगार नियमित करावेत, अशीही मागणी करण्यात आली.

बुट्टेनात साठवण तलाव निर्मिती व काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा, तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आटोक्यात आणून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी लोकविकास महाआघाडीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.