डॉ. एकनाथ शेळके आणि डॉ. ज्ञानोबा दराडे यांचं सर्व स्तरांतून होतंय अभिनंदन…!
टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने मोतीबिंदू शस्त्रक्रियांच्या कार्यक्षमतेत महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावून राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे. या उल्लेखनीय यशात नेत्ररोग विभागातील डॉक्टरांचे कौशल्य आणि समर्पित सेवाभाव निर्णायक ठरला आहे.
या कामगिरीत डॉ. एकनाथ शेळके यांनी राज्यात प्रथम क्रमांक, तर डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ‘स्वाराती’ च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. एकनाथ शेळके यांनी 969 तर डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी 966 शस्त्रक्रिया केल्या आहेत. कमी वेळेत अधिक यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णसुरक्षा आणि उत्कृष्ट उपचारपद्धती यामुळे हे यश साध्य झाले आहे.
‘स्वाराती’ तील नेत्ररोग विभागाने ग्रामीण व दुर्लक्षित भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देत आरोग्यसेवेत नवा मानदंड निर्माण केला आहे. या घवघवीत यशाबद्दल ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, सर्व विभागप्रमुख, सहकारी डॉक्टर व कर्मचारी वर्गाने दोन्ही डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.



