टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या राजकारणात तब्बल 35 वर्षांची यशस्वी कारकीर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांना 2025 च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रथमच पराभव स्वीकारावा लागला. मात्र, हा पराभव न मानता, त्यातूनच आत्मपरीक्षण करत ‘बिघडले कुठे ?’ असा प्रश्न स्वतःला विचारून मोदी नव्या जोमाने पुन्हा मैदानात उतरले आहेत. पराभवाच्या दुसऱ्याच दिवसांपासून, दि. 22 डिसेंबरपासून राजकिशोर मोदी अंबाजोगाई शहर व परिसरातील विवाह सोहळे, अंत्यविधी तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत समाजकारणात सक्रिय झाले आहेत. पराभवाचं शल्य विसरुन त्यांनी मतदारांशी पुन्हा थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेत 1991 साली प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मोदींनी पुढे अनेक वेळा नगराध्यक्षपद भूषवले. 2001 ते 2009 या काळात सलग नगराध्यक्ष राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई नगरपरिषदेत अनेक विकासकामे झाली, तसेच अनेक तरुणांना नगरसेवक, सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अंबाजोगाई आणि राजकिशोर मोदी हे एकमेकांशी घट्ट जोडलेले समीकरण बनले.
2025 च्या निवडणुकीत नगराध्यक्षपद नंदकिशोर मुंदडा यांनी जिंकले असले, तरी सभागृहात मोदी समर्थकांचे 20 नगरसेवक विजयी झाले आहेत. मतदारांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत मोदींनी कोणावरही दोष न देता, टीका – टिप्पणी टाळली आहे. ‘ज्यांनी 25 वर्षे प्रेम दिलं, तेच पुन्हा साथ देतील’ असा विश्वास व्यक्त करत त्यांनी समर्थकांना पुन्हा उभे राहण्याचे आवाहन केले आहे. पराभव असूनही खचून न जाता, नव्या उमेदीने समाजकारणात सक्रिय झालेल्या राजकिशोर मोदींकडे आता अंबाजोगाईतील राजकीय हालचालींचे लक्ष लागले आहे.



