अंबाजोगाई नगरपरिषदेत ‘सत्तासंघर्ष’ : खुर्ची मुंदडांकडे, ताकद मोदींकडे, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीचे नंदकिशोर मुंदडा हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. मात्र, या विजयासोबतच नगरपरिषदेत सत्तासंतुलनाचे वेगळेच चित्र समोर आले आहे.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांच्या अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले आहेत. तर दुसरीकडे लोकविकास महाआघाडीचे राजकिशोर मोदी यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांच्या आघाडीचे तब्बल 20 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मोदी गटाकडे आहे.

या पार्श्वभूमीवर मुंदडा नगराध्यक्ष असले तरी नगरपरिषदेत त्यांना बहुमताचा आधार नसल्याने निर्णय घेताना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. कोणताही महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यासाठी त्यांना लोकविकास महाआघाडीच्या नगरसेवकांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात नगरपरिषदेत सत्तासंघर्ष, राजकीय समन्वय आणि तडजोडींचे राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सत्तासंतुलनाचा पेच..!

अंबाजोगाई नगरपरिषदेत नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीचे असले, तरी सभागृहातील स्पष्ट बहुमत राजकिशोर मोदी यांच्या लोकविकास महाआघाडीकडे आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांचा कारभार आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. निर्णयप्रक्रियेत अडथळे, राजकीय संघर्ष आणि अस्थिरतेचे वातावरण नगरपरिषदेत निर्माण होण्याची शक्यता असून निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवताना नगराध्यक्ष मुंदडा यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.