टीम AM : विधानसभा निवडणूकीच्या नंतर विधानसभेत शप्पथ घेताना कधी नव्हे तर आमदार नमिता मुंदडा यांना बाबासाहेबांची आठवण झाली आणि शपथग्रहण केल्यानंतर त्यांनी ‘जयभीम’ हा शब्द उच्चारतं बाबासाहेबांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त केली. नगरपरिषदेच्या मतमोजणीनंतर निवडून आलेल्या आमदारांच्या सासऱ्यांनी तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडांनी बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकाराबद्दल भाष्य केले. परंतू, केज मतदार संघाच्या आमदार असोत किंवा निवडून आलेले त्यांचे सासरे यांनी केवळ शपथेपुरते किंवा निवडणूकीपुरते बाबासाहेबांचं नाव न घेता सामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या वस्त्यात विकासाची गंगा पोचवायला हवी. धनदांडग्यांच्या वस्त्यांसारखा मागासवर्गीयांच्या वस्त्यांचा शाश्वत विकास करण्यात यावा, हिच अपेक्षा मुंदडा कुटुंबाकडून मागासवर्गीय जनता करीत आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक गेल्या 9 वर्षांपासून रखडली होती. आता नगरपरिषदेची निवडणूक पार पडली असून नगराध्यक्षपदी अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीचे नंदकिशोर मुंदडा निवडून आले आहेत. विधानसभा निवडणूकीत आमदार नमिता मुंदडा आणि नगरपरिषद निवडणुकीतही नंदकिशोर मुंदडा यांना मागासवर्गीय वस्त्यांतून मतदारांचा कौल मिळाला आहे, हे निकालातून समोर आले आहे.
परंतू, मधल्या काळात अंबाजोगाईच्या विकासासाठी आणि रस्तेकामासाठी आमदार महोदयांनी करोडो रुपायांचा निधी आणला. हा निधी केवळ प्रस्थापितांच्या आणि धनदांडग्यांच्या वस्त्यासाठीच वापरण्यात आला. या वस्त्यांतील रस्ते, नाली बांधकाम मोठ्या प्रमाणात झाली. परंतू, मागासवर्गीयांच्या वस्त्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत. नाल्या तुंबलेल्या, रस्ते उखडलेले, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, अशा परिस्थितीत या वस्त्यांतील सामान्य माणसं गुजरान करीत आहेत.
दिवसभर काम केल्याशिवाय या सामान्य माणसांची चूलही पेटत नाही. त्या माणसांना मुलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी झगडयाला वेळ नाही. अशा माणसांच्या वस्त्यात मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. तरचं त्यांचं जीवन सुखकर आणि आनंदमयी होईल. याकडे आमदार महोदया आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा लक्ष देतील, अशी अपेक्षा या वस्त्यातील सामान्य जनता करीत आहे. यात येणाऱ्या काळात बदल घडून येईल, याची अपेक्षा करण्यात काहीच हरकत नाही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…!



