अंबाजोगाई कनेक्शन असलेलं ‘पंकजाताई बाग फुलवते रे…’ गाणं राज्यभर गाजतंय, वाचा…!

टीम AM :  राजकीय वर्तुळात प्रचंड लोकप्रिय ठरलेलं ‘पंकजाताई बाग फुलवते रे – ‘बीजेपी’ च्या कमळाचा…!’ हे गाणं सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आपल्या बहारदार आणि दमदार आवाजात हे गाणं सादर केलं असून, श्रोत्यांनी या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

या गाण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचं अंबाजोगाई कनेक्शन. हे गाणं अंबाजोगाई येथील भीमनगर भागातील सुप्रसिद्ध गीतकार बन्सी साळवे यांनी लिहिलं आहे. 

बन्सी साळवे हे गेल्या अनेक वर्षांपासून गायक आनंद शिंदे यांच्यासोबत गीतलेखन, शेरोशायरी आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून काम करत आहेत. आनंद शिंदे यांच्या बहुतांश लोकप्रिय लोकगीतांचं लेखन बन्सी साळवे यांनीच केलं आहे.

बन्सी साळवे यांनी लिहिलेली अनेक लोकगीते यापूर्वीही महाराष्ट्रभर गाजली असून, ती गाणी प्रामुख्याने आनंद शिंदे यांनीच गायली आहेत. त्यांच्या गीतांमध्ये सामाजिक आशय, जनभावना आणि लोकसंस्कृतीचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो.

‘पंकजाताई बाग फुलवते रे – ‘बीजेपी’ च्या कमळाचा…!’ या गाण्याला संगीत आनंद शिंदे यांचे सुपुत्र डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी दिलं असून, संगीत संयोजन सुदेश गायकवाड यांचं आहे.‌ या गाण्याची संकल्पना आणि निर्मिती राजाभाऊ घुले यांची आहे. 

राजकीय आशय आणि दमदार सादरीकरणामुळे हे गाणं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. हे गाणं, विशेषतः समस्त वंजारा समाजाच्या बांधवांसह महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं असून कार्यक्रम, सोशल मीडियासह विविध ठिकाणी या गाण्याची जोरदार चर्चा सुरू असते. अंबाजोगाईच्या भूमीतून घडलेलं हे गीतलेखन राज्यभर पोहोचून लोकप्रिय ठरणं, ही अंबाजोगाईसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.