टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली आहे. या प्रभागात लोकविकास महाआघाडीचे राजपाल जावळे आणि पठाण नाजनीन बेगम अकबर खां यांनी प्रत्येकी 1354 मते मिळवत विजय संपादन केला आहे. दोन्ही विजयी उमेदवारांना समान मते मिळाल्याने हा निकाल नगरपरिषद निवडणुकीच्या इतिहासात एक दुर्मिळ आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. निकाल जाहीर होताच प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. समान मतसंख्येने मिळालेल्या या विजयामुळे मतदारांचा कौल किती काटेकोर आणि तोलामोलाचा होता, हे स्पष्ट झाले आहे.
या निकालामुळे लोकविकास महाआघाडीला प्रभाग क्रमांक 13 मध्ये महत्त्वाचे यश मिळाले असून आगामी नगरपरिषद कारभारात या दोन्ही नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत विकासकामांना गती देण्याचे आव्हान आता नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर उभे आहे.



