टीम AM : मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अलिबागमधील नागाव इथल्या ज्या शाळेत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा आपल्या शालेय आणि चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात बंद होत असलेल्या मराठी शाळेची कथा मांडण्यात आली आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ 1 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. या ट्रेलरमधून अजून एक सरप्राईज समोर आलंय ते म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत आणि त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.



