अंबाजोगाई नगरपरिषदेवर मुंदडांची सत्ता : मोदींचा पराभव, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून या अटीतटीच्या लढतीत अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीचे उमेदवार नंदकिशोर शिवबगस मुंदडा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर लोकविकास महाआघाडीचे उमेदवार राजकिशोर कांताप्रसाद मोदी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अंबाजोगाईकरांनी मुंदडा यांना स्पष्ट कौल दिल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे.

नंदकिशोर मुंदडा यांना 22,777 मते मिळाली, तर राजकिशोर मोदी यांना 20280 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमधील मतांचा फरक 2497 लक्षवेधी ठरला असून संपूर्ण मतमोजणीदरम्यान मोठी उत्सुकता आणि तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, नगरपरिषद सदस्य निवडणुकीत अंबाजोगाई परिवर्तन जनविकास आघाडीचे 11 उमेदवार, तर लोकविकास महाआघाडीचे 20 उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, नगराध्यक्ष पदाचा कौल मुंदडा यांच्या पारड्यात पडल्याने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडून आला आहे.

या निकालानंतर मुंदडा समर्थकांनी शहरात जल्लोष करत आनंद व्यक्त केला, तर दुसरीकडे पराभूत उमेदवार मोदी यांच्या समर्थकांमध्ये निराशा पाहायला मिळाली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई नगरपरिषदेचा आगामी कारभार कसा राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.