विरोधकांच्या दहशतीला न जुमानता सुजाण अंबाजोगाईकरांनी मतदान केले : मोदींनी मानले आभार
टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत विविध अडथळे, अफवा व दबावतंत्राचा सामना करत सुजाण अंबाजोगाईकरांनी निर्भयपणे मतदान केल्याबद्दल लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी मतदारांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
मोदी म्हणाले की, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर व्हायला हवी होती, मात्र विरोधकांनी खोटे आरोप, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, पोलिसांवर दबाव, तसेच मतदान केंद्रांवर तणाव निर्माण करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून खालच्या स्तरावर जाऊन बदनामीची मोहिम राबविण्यात आली. काही ठिकाणी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेकडो अनोळखी लोक शहरात आणून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही प्रभागात आमच्या उमेदवारांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न घडवून आणला गेला. प्रभाग रचनेतील बदलांमुळे मतदारांची मोठी ससेहोलपट झाली, अनेकांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले, असेही मोदी यांनी सांगितले. प्रभाग 9 आणि 15 मध्ये सोशल मीडियावर खोटी माहिती व्हायरल करून मतदारांची दिशाभूल आणि उमेदवारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, परंतू, हे सर्व प्रयत्न अंबाजोगाईकरांनी फेटाळून लावल्याचे मोदी यांनी नमूद केले.
मोदी म्हणाले, ‘अंबाजोगाईला बिहार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुजाण जनतेने धुडकावून लावला. आम्ही संयम राखला, मतदारांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली. शांततेत मतदान व्हावे हा आमचा मूल्याधिष्ठित दृष्टिकोन पुढेही कायम राहील.’
मतदारांचे जाहीर आभार
मोदी यांनी पुढे सांगितले, ‘अंबाजोगाईकरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास अमूल्य आहे. आम्हाला दिलेल्या प्रेम, सहकार्य आणि आशीर्वादाबद्दल मी आणि लोकविकास महाआघाडीचे सर्व उमेदवार जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, ही ग्वाही देतो.
– राजकिशोर मोदी – लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार



