अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक : 70.35 टक्के मतदानाची नोंद, मोदी – मुंदडा आमने – सामने

मतदारांचा उत्साह, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, 21 डिसेंबरपर्यंत उमेदवारांची धाकधूक

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूकीत मंगळवारी 70.35 टक्के मतदानाची नोंद झाली‌ आहे. सकाळपासूनचं मतदारांनी केंद्रांवर हजेरी लावल्याने शहरात निवडणूक वातावरण तापले होते. विशेष म्हणजे, दोन प्रमुख आघाड्यांमधील थरारक लढतीमुळे मतदारांच्या उत्साहात लक्षणीय वाढ दिसून आली. या निवडणूकीत लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि अंबाजोगाई शहर जनविकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्यातचं थेट सामना रंगला. या दोन्ही उमेदवारांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याने शहरात वातावरण तापले होते. प्रत्येक प्रभागात मतदारांना पटवण्याची शर्यत सुरु होती. त्याचा परिणाम मतदान केंद्रांवरही दिसून आला.

तुरळक किरकोळ घटना वगळता संपूर्ण शहरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुपारी काही केंद्रांवर रांगा वाढल्या असल्या तरी मतदान सुरळीत झाले. शहरातील तरुण मतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला.

आता सर्वांच्या नजरा 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. कोणाचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे‌ ? कोण नगराध्यक्षपदाची गादी मिळवेल ? हे पाहण्यासाठी राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर मात्र निकालापर्यंतची धाकधूक कायम आहे. अंबाजोगाईतील ही निवडणूक शहराच्या पुढील पाच वर्षांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याने निकालाकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत.