टीम AM : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत 35 जागांवरील मतदान तूर्तास रद्द केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्ह्यांतील नगरपालिका आणि नगरपंचायतीतील 35 जागांवरील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द झाले आहे.
छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात संबंधित 35 जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर 25 नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते. मात्र, अंतिम निर्णय न झाल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे. न्यायालयाचे आदेश न मिळाल्याने या प्रभागांमध्ये उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटपच शक्य नसल्याने मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील जागांवरील मतदानाला स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाची अधिकृत माहिती पाठवली आहे.



