टीम AM : अनिल कपूर नायक असलेला मि. इंडिया हा चित्रपट तुफान गाजला होता. त्याच्याकडे असणाऱ्या गॅजेटमुळे तो अदृश्य होतो आणि कोणालाही दिसत नाही. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता ‘मि. इंडिया’ ची तीच उपमा शहरातील काही प्रभागातील नगरसेवकांना मतदार देत आहेत. हेच मि. इंडिया गेल्या पाच वर्षात जनतेच्या सुखदुःखात तर सोडा कधी प्रभागात आणि वार्डातही दिसले नाहीत. असेच काही प्रभागात मि. इंडिया नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदार ही त्यांना ’मोकॅम्बो खुश हुआ’ म्हणत घरचा रस्ता दाखवणार आहेत, असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक रंगात आली असून दररोज शहरात नवनवीन घडामोडी पहावयास मिळत आहेत. त्यातच फोडाफोडीच्या राजकारणाचा उत आला असून मतदार बांधवही राजकीय नेत्यांच्या कृतीकडे बारीक लक्ष ठेऊन आहेत. नगरपरिषद निवडणूक ही थेट मोदी – मुंदडा गटात होणार असून त्या दृष्टीने राजकिशोर मोदी आणि नंदकिशोर मुंदडा यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातचं काही प्रभागात मि. इंडिया नगरसेवकांची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे. गेल्या पाच वर्षांत प्रभागात न फिरलेले, जनतेच्या सुखदुःखात न सामील झालेले आणि विकासकामात शून्य कामगिरी असलेले ‘मि. इंडिया नगरसेवक’ पुन्हा रणांगणात उतरले असून मतदार यावेळी त्यांना धडा शिकवण्याच्या मूडमध्ये असल्याचे चित्र आहे.
अनिल कपूरच्या ‘मि. इंडिया’ चित्रपटातील अदृश्य व्यक्तीप्रमाणे, हे नगरसेवक कार्यकाळभर प्रभागातून अदृश्य होते, अशी टीका मतदारांकडून होत आहे. अनेकांना तर प्रभागात खरोखर नगरसेवक अस्तित्वात आहेत की नाही, याचीच शंका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
नगरपरिषदेच्या यंदाच्या निवडणूकीत मतदार विचारपूर्वक मतदान करणार असून, अशा ‘मि. इंडिया’ प्रकारातील उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी मतदार सज्ज असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. नगरपरिषद निवडणूक जशी – जशी जवळ येत आहे, तसतशी ही चर्चा अधिक चांगल्या प्रकारे उफाळून येत असून यंदाची निवडणूक अनेक ‘अदृश्य’ चेहऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार, अशी चर्चा प्रत्येक कोपऱ्यात रंगू लागली आहे.



