राजकिशोर मोदी यांचा अर्ज वैध‌ : नंदकिशोर मुंदडा यांचा आक्षेप फेटाळला, वाचा…!

टीम AM : लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर कांताप्रसाद मोदी यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी मंगळवार, दि. 18 रोजी झालेल्या पडताळणीत फेटाळून लावला. अर्जामध्ये कोणताही दोष न आढळल्याने मोदी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे.

नगरपरिषद निवडणूक घोषित झाल्यापासूनचं राजकिशोर मोदी यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून त्यांचे सहकारी भाजपमध्ये नेण्याचे प्रयत्न, दडपशाही व आमिषे अशा अनेक स्तरांवरून दबाव टाकला गेला. तरीही जनतेमधील मोदी यांच्याबद्दलची लोकप्रियता कमी न झाल्याने विरोधक अस्वस्थ झाल्याचे जाणवते.

अर्ज पडताळणीदरम्यान मुंदडा यांनी मोदी यांच्या अर्जातील क्रमांक 5 च्या रकान्यात ‘जातीचा उल्लेख’ लिहिल्याबाबत तोंडी आक्षेप घेतला होता. मात्र, नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील असल्याने जातीचा उल्लेख केला किंवा नाही केला तरी ते अप्रस्तुत असल्याचे निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आक्षेप त्वरित फेटाळण्यात आला. तसेच आक्षेप घ्यायचा असल्यास तो लेखी स्वरूपात द्यावा, असेही सांगितले गेले. परंतू मुदत संपेपर्यंत विरोधकांकडून कोणताही लेखी आक्षेप दाखल झाला नाही.

यावर प्रतिक्रिया देताना राजकिशोर मोदी म्हणाले, विरोधकांनी रडीचा डाव खेळण्यापेक्षा नैतिकतेने निवडणूक लढवावी. आजवर माझ्यावर अनेक बिनबुडाचे आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही. अंबाजोगाईची सुजाण जनता खोट्या प्रचाराला किंवा आमिषांना बळी पडणार नाही. याचा निकालात स्पष्ट प्रत्यय येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेला वेग येत असतानाचं मोदी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर मोदींच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here