अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक : लोकविकास महाआघाडीला तीन पक्षांचा जाहीर पाठिंबा, वाचा…!

टीम AM : आगामी नगरपरिषद निवडणुकीत लोकविकास महाआघाडीला मोठा राजकीय हातभार मिळाला आहे. रिपाइ (आठवले गट), समाजवादी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या तीन पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

पत्रकार परिषदेत तीनही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी महेंद्र निकाळजे, सुनिल जगताप, ॲड. शिवाजी कांबळे उपस्थित होते. शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी लोकविकास महाआघाडी सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पाठिंब्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत महाआघाडीची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

या घोषणेनंतर अंबाजोगाईतील निवडणूक परिस्थितीत नवीन समीकरणे तयार होणार असून, महाआघाडीच्या उमेदवारांना अतिरिक्त बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

पत्रकार परिषदेला लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष [शरद पवार गट] अमर देशमुख, गोविंद पोतंगले, विशाल जाजू, डॉ. राजेश इंगोले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.