टीम AM : अंबाजोगाई शहरातील एका वसतिगृहात 11 वीच्या वर्गातील आरुष चौरे या तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरुष चौरे याने नुकताच 11 वी वर्गात प्रवेश घेतला होता आणि शिक्षणासाठी शहरातील एका वसतिगृहात राहत होता. शनिवारी त्याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानसिक तणाव, शिक्षणातील दडपण किंवा इतर काही कारण होते का, याचा तपास पोलिस करत आहेत.
या घटनेने आरुषच्या मित्रपरिवारात व शिक्षकांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू असून विद्यार्थ्यांवरील मानसिक तणावाचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



