टीम AM : मुंबईतील गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करतात, पण याच गर्दीत एका दिवसात एका महिला अधिकारीने असं काम केलं, ज्याने संपूर्ण रेल्वे नेटवर्कमध्ये चर्चा उडवली.
रुबिना इनामदार, मध्य रेल्वेच्या प्रवासी तिकीट तपासणी अधिकारी (TTI), यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवसात 150 प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. एकूण ₹45,705 दंड म्हणून वसूल करण्यात आला. ही कामगिरी स्वतःच एक विक्रम ठरली आणि रुबिनाच्या प्रामाणिकपणाचे आणि काटेकोरपणाचे शहरात कौतुक झाले. त्यांची ही तपासणी सेंट्रल लाईनच्या विविध विभागांवर झाली होती. यापैकी 57 प्रवासी प्रथम श्रेणीच्या डब्यात विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले, ज्यांच्याकडून फक्त ₹16,430 दंड वसूल झाला.
मुंबईत अनेकदा गर्दीच्या वेळी जनरल डिब्ब्यांमधील प्रवासी अनेकदा ‘एसी’ व फर्स्ट क्लास कोचमध्ये प्रवेश करतात. यामुळे खऱ्या तिकिटाच्या प्रवाशांना त्रास होतो आणि रेल्वेलाही मोठे नुकसान सहन करावे लागते. रुबिनाने या प्रवृत्तीवर कठोरपणे आळा घातला. त्यांचे हे काम फक्त एक नोकरी नव्हती, तर अनुशासन आणि प्रामाणिकपणाची आदर्श उदाहरण बनले.
सेंट्रल रेल्वेने रुबिनाच्या या कामगिरीला ‘रिकॉर्ड ब्रेकिंग डे’ म्हणून घोषित करून सोशल मिडियावर प्रशंसा केली. त्यांच्या कामामुळे सर्वसामान्य लोकही प्रभावित झाले.
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास हे बऱ्याच काळापासून एक आव्हान राहिले आहे. पण रुबिनासारख्या अधिकारी हे सिद्ध करत आहेत की योग्य हेतू आणि मेहनतीने व्यवस्थेला शिस्तबद्ध बनवता येते. त्यांच्यासारख्या व्यक्तींमुळे आज सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेचे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने चांगले परिणाम देत आहे.



