टीम AM : गाण्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी (6 नोव्हेंबर) रात्री 8 वाजता निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचे संगीतकार बंधू जतिन-ललित आणि अभिनेत्री-पार्श्वगायिका बहीण विजयता पंडित आहेत. पंडित जसराज त्यांचे काका होते. संगीत हा त्यांच्या घराण्याचा आत्मा राहिला आहे. आज (7 नोव्हेंबर) दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सुलक्षणा पंडित यांचा जन्म 12 जुलै 1954 रोजी झाला. यांनी त्यांच्या कलागुणांवर हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावले होते. वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे 1967 मध्ये त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. तर 17 व्या वर्षी त्यांना ‘संकल्प’ चित्रपटातील ‘तू ही सागर हैं, तू ही किनारा’ या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्या गातच राहिल्या. खरंतर अभिनेत्री म्हणून त्या नंतर पुढे आल्या आणि अभिनयाची चमक त्यांनी दाखवली होती. 1975 मध्ये ‘उलझन’, पुढे 1976 मध्ये ‘संकोच’ या चित्रपटांमध्ये नायिका साकारली. 1977 मध्ये झळकलेला ‘अपनापन’ चित्रपट खूप गाजला. त्यातील त्यांची जितेंद्रसोबतची भूमिकाची सहजसुंदर होती. यातील ‘सोमवार को हम मिलें मंगलवार को नैंन’ हे त्यांनी किशोरकुमार सोबत गायलेलं गाणं खूप गाजले. आहिस्ता आहिस्ता चित्रपटातील (1981) पद्मिणी कोल्हापुरे यांच्यावर चित्रित केलेले ‘माना तेरी नजर में तेरा प्यार हम नही’ हे गाणेही खूप लोकप्रिय झाले होते.
संजीव कुमार साठी अविवाहीत
सलक्षणा पंडित यांचे अभिनेता संजीव कुमार यांच्यावर जीवापाड प्रेम होते. ‘उलझन’, वक्त की दिवार’ (1980) आदी चित्रपटांमध्ये त्या संजीवकुमार यांच्या नायिका होत्या. ‘उलझन’ चित्रपट करत असताना त्या संजीवकुमार यांच्या प्रेमात पडल्या. इतक्या की शेवटपर्यंत त्या प्रेमातून बाहेर येऊ शकल्या नाहीत.
सुलक्षणा पंडित यांना संजीवकुमार यांच्यासोबत लग्नाची गाठ बांधायची होती तर संजीवकुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात बुडाले होते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी विवाह केल्यानंतर संजीवकुमार निराश झाले. पुढे त्यांनी विवाह केला नाही. तर संजीवकुमार यांनी नकार दिल्यामुळे सुलक्षणा पंडित नैराष्येत गेल्या. 1980 मध्ये ‘साजन की सहेली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातील ‘जिस कें लिए सब को छोडा, उसी नें मेरे दिल को तोडा’ हे गाणे सुलक्षणा पंडित यांनी गायले होते आणि ते रेखा यांच्यावर चित्रित केले होते. वास्तवात सुलक्षणा पंडित यांचीही अशीच अवस्था झाली होती. संजीवकुमार यांच्या नकारानंतर त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
संजीवकुमार यांच्याव्यतिरिक्त त्यांनी कुणालाही आपलं मानलं नाही. मात्र, संजीवकुमार यांना त्यांच्या प्रेमाची पारख करता आली नाही. त्यामुळे त्या निऱाश झाल्या, त्यांना डिप्रेशन आले. पुढे चित्रपटक्षेत्रातून त्या बाहेर पडल्या. त्या वारंवार आजारी पडू लागल्या. योगायोग पाहा संजीव कुमार यांचे निधन 6 नोव्हेंबर 1985 रोजी मुंबईत झाले. त्यानंतर 40 वर्षांनंतर याच दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबर 2025 रोजी सुलक्षणा पंडित यांनी जगाचा निरोप घेतला. जणू दोघे एकमेकांसाठी होते, दुर्दैवाने नियतीने त्यांना एकत्र येऊ दिले नाही.
सुलक्षणा पंडित यांनी ऐन तारुण्यातच चित्रपटसृष्टीतून एक्झिट घेतली. प्रेमभंग त्यांना सहन झाला नाही. मात्र, त्या त्यांच्या प्रेमाशी कायम एकनिष्ठ राहिल्या. त्यांचे पार्श्वगायन आणि अभिनय यामुळे त्या कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील, यात शंका नाही.



