टीम AM : दिग्गज गायिका व ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं आहे. 1970 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुलक्षणा या 71 वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
सुलक्षणा या संगीतकार जतिन – ललित आणि अभिनेत्री विजयता पंडित यांची बहीण होत्या. सुलक्षणा मागील काही काळापासून आजारी होत्या. ललित पंडित यांनी बहिणीच्या निधनाची पुष्टी केली आहे. सुलक्षणा यांचे गुरुवारी रात्री 8 वाजता नानावटी रुग्णालयात निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. शुक्रवारी, 7 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती ललित पंडित यांनी दिली.
सुलक्षणा पंडित यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहते त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. सुलक्षणा यांनी 70 च्या दशकात करिअरला सुरुवात केली होती. उत्तम गायिका असलेल्या सुलक्षणा अभिनयक्षेत्रात आल्या आणि अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.
सुलक्षणा पंडित यांनी 1975 मध्ये ‘उलझन’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या सिनेमात संजीव कुमार मुख्य भमिकेत होते. ‘संकोच’, ’हेरा फेरी’, ‘अपनापन’, ‘खानदान’, ‘चेहरे पे चेहरा’, ‘धरम कांटा’ आणि ‘वक्त की दीवार’ हे सुलक्षणा पंडित यांचे गाजलेले चित्रपट होय.
लग्न केले नाही
सुलक्षणा संपूर्ण आयुष्यभर एकट्या होत्या. सुलक्षणा यांचे संजीव कुमारसोबत अफेअर होतं. मात्र, ही प्रेमकथा अधुरीच राहीली, त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला. बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर सुलक्षणा यांना विविध आजारांनी ग्रासले, तसेच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सुलक्षणा यांच्या निधनाने चित्रपट आणि संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.



