अंबाजोगाईत आंबेडकरवादी व मार्क्सवादी पक्षाचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
टीम AM : फलटण येथे उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात राज्यकर्त्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाई शहरात आंबेडकरवादी पक्ष, संघटना व मार्क्सवादी पक्षाच्या वतीने येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन देऊन डॉ. संपदा मुंडे यांची संस्थात्मक हत्येचा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवा, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मंगळवार, दिनांक 28 ऑक्टोबर रोजी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरवादी पक्ष, संघटना व मार्क्सवादी पक्षाच्या वतीने डॉ. संपदा मुंडे यांच्या संस्थात्मक हत्येच्या विरोधात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी निदर्शकांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फलटण येथे उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसुन हत्याच आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ असे ब्रीदवाक्य असणारे पोलीस खात्यातील अधिकारी यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्यावर चार वेळा अत्याचार केला. यामुळे कुंपणच शेण खात आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा कलंकित होत आहे. महिला डॉक्टरच्या खुनास जबाबदार पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी व दबाव आणणारे खासदार, राजकीय पदाधिकाऱ्यांना ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी, सदरील खटला बीड जिल्ह्यातच चालवून न्याय देण्यात यावा. तसेच डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना दहा कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी आंबेडकरवादी पक्ष, संघटना व मार्क्सवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
सदरील निदर्शनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. बब्रुवाहन पोटभरे, भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, लोकजनशक्ती पार्टी (र) युवाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, भगवानबाबा युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्रे, बहुजन विकास मोर्चाचे विनोद शिंदे, लोकजनशक्ती पार्टी (र) युवाचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे, केज तालुकाध्यक्ष गंगाधर पौळ, अझहर सय्यद, भिमशक्तीचे जिल्हा संघटक जीवन घाडगे, तालुकाध्यक्ष सुमीत आवाडे, तालुका उपाध्यक्ष संकेत तरकसे, बालाजी चाटे, महेश गर्जे, पवन चाटे, अवधूत गर्जे, प्रशांत गंभीरे, सचिन गुट्टे, कॉ. उषाताई माने, कॉ. सरोज सरवदे, कॉ. सुहास चंदनशिव, कॉ. प्रशांत मस्के, कॉ. व्यंकट ढाकणे, कॉ. विनायक राजमाने, कॉ. जगन्नाथ पाटोळे, मनिष आदमाने, प्रेम माने यांच्यासह आंबेडकरवादी पक्ष, संघटना व मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


