टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी थकित वेतनाच्या मागणीसाठी आज दिनांक 27 ऑक्टोबरपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सफाई कामगारांनी उपोषण सुरू केल्यामुळे शहरातील स्वच्छतेची यंत्रणा विस्कळीत झाली असून रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग वाढू लागले आहेत.
अंबाजोगाई शहरातील सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक मानले जातात. दररोज पहाटेपासून गल्लीबोळ स्वच्छ ठेवणारे हेच हात आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तब्बल 3 महिने 20 दिवसांचे वेतन आणि थकित भविष्य निर्वाह निधी अद्याप मिळालेला नसल्याने कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. थकित वेतन न मिळाल्यामुळे सफाई कामगारांची दिवाळी अंधारात गेली.
माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली भेट
दरम्यान, प्रहार कामगार संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भेट देत उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामगारांचे वेतन आणि निधी तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कामगारांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अशोक गंडले यांनी दिला आहे.


