शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा : संभाजी ब्रिगेडचे आमदारांच्या घरासमोर आंदोलन, वाचा…

टीम AM : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी एक लाख रुपये व गुराढोरांच्या बाजार किंमती प्रमाणे मदत करत राज्य सरकारने त्यांना धीर द्यावा, या‌ प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ‌वतीने‌ आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी अनोखे आंदोलन केले. संभाजी ‌ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट ‌आमदार नमिता मुंदडा यांचे घर गाठत त्यांच्या ‌घरासमोरचं ठिय्या देत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार ‌घोषणाबाजी ‌केली. 

आमदार नमिता मुंदडा ‌यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीने त्रस्त झाला आहे. या आलेल्या महाभयंकर पुरामुळे सर्व ग्रामीण भाग‌ व शेती आणि शेतकरी अडचणीत सापडून हवालदिल झाला आहे. महाराष्ट्राच्या कित्येक भागात शेतकऱ्यांची पिके तर संपूर्णपणे उध्वस्त झालेली आहेतच. परंतू, पुराच्या पाण्यामुळे शेत जमीन सुद्धा खरडून गेली आहे. तसेच अनेक गावेच्या गावे पुराखाली गेलेली असल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाले आहेत. तसेच, जनावरे आणि गुरेढोरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. शेती सोबतच घरदार, संसाराला लागणारे सर्व साहित्य आणि मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे या पुराच्या पाण्यात अतोनात नुकसान झाले आहे. हातामध्ये आलेले पीक पूर्णपणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद कमजोर झाली आहे. चारही बाजूंनी तो भयानक संकटात सापडलेला असून येणाऱ्या काळात निराशा आणि नुकसानीमुळे आत्महत्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी शेतकरी आणि पूरग्रस्त लोकांना आधार देणे, त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना धीर देणे हे महाराष्ट्राचे जागृत आणि संवेदनशील नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला ज्या ज्या प्रकारचे सहकार्य या आपत्तीग्रस्तांना करता येईल ते प्रत्येकाने करावे. सर्व स्तरातील लोकांनी या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करावे. आमदार, खासदार, मंत्री, नोकरदार, व्यापारी, उद्योगपती, समाजातील श्रीमंत वर्ग, सर्व शैक्षणिक संस्था, सर्व हिंदी – मराठी व इतर चित्रपट श्रृष्टी, टिव्ही चॅनल्स आणि सर्व धार्मिक स्थळे या सर्वांनी जेवढी जास्त मदत पैशांच्या, वस्तूंच्या, संसार उपयोगी साहित्याच्या स्वरूपात करता येईल ती केली पाहिजे. सरकारने त्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करून त्यांना या नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी आपली तिजोरी खुली करावी. कोणतेही निकष न लावता व नियमांच्या चाकोरीत न अडकता जनतेला भरघोस मदत करावी.

तसेच ‘शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी एक लाख रुपये व गुराढोरांच्या बाजार किंमती प्रमाणे मदत करत त्यांना धीर द्यावा. सरकारने बाकीच्या लोकप्रिय योजनांवर काही काळ अंकुश लावून सध्याची प्राथमिकता ही फक्त आणि फक्त अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करणे आहे हे लक्षात घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे आणि संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची महाराष्ट्राची महान परंपरा कायम ठेवावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रवीण ठोंबरे, रामकिसन मस्के, सतिष कुंडकर, ओंकार पतंगे, नारायण मुळे, हर्षवर्धन तरकसे, उमेश चौधरी, विशाल खोडसे, कमलाकर चव्हाण, ओमकार सोमवंशी यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.