घाटनांदूरात अतिवृष्टी : तहसीलदार थेट ग्राऊंडवर, तातडीच्या उपाययोजना सुरू, वाचा…

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी – नाले तुडुंब भरून वाहत असून ग्रामीण भागासह शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत तर काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, घाटनांदूर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार विलास तरंगे यांनी थेट घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

घाटनांदूर परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील दलित वस्तीमध्ये पाणी शिरल्याने वार्ड क्रमांक 5 व 6 मधील ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तरंगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत ग्रामपंचायतीला उपाययोजनांची कामे वेगाने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘जेसीबी’ मशीनद्वारे डाव्या बाजूचा नाला मोकळा करण्यात आला आणि पाण्याचा प्रवाह मुख्य नाल्यास जोडण्यात आला.

दरम्यान, पाणी घरात शिरल्याने एका कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले असून उर्वरित प्रभावित कुटुंबांना धान्यकीट वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी 24 तासांतही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आजारी ग्रामस्थांची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी महेश फड, ग्राम महसूल अधिकारी फुलचंद शिरसाट आदी उपस्थित होते.