बीडला होणार ‘एमआयडीसी’ : अंबाजोगाईकडे मात्र लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष

आश्वासनांचा विसर : अंबाजोगाईत ‘एमआयडीसी’ चा विषय धूळखात

टीम AM : बीड जिल्ह्यात 1 हजार एकरवर ‘एमआयडीसी’ उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांनी यासंदर्भात जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत. बीडच्या विकासाला यामुळे गती मिळणार असली तरी अंबाजोगाईतील तरुणांचा प्रश्न कायम आहे. अंबाजोगाईत ‘एमआयडीसी’ कधी होणार ? असा प्रश्न लोकप्रतिनिधींना केज मतदारसंघातील तरुण विचारत आहेत.

अंबाजोगाईत ‘एमआयडीसी’ ची मागणी फार जुनी असून गेल्या अनेक दशकांपासून हा विषय चर्चेत आहे. परंतु, कोणत्याही लोकप्रतिनिधींना आजवर तो सोडवता आला नाही. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनं दिली जातात, पण निवडणूक संपताच विषय पुन्हा ‘जैसे थे’ होतो. त्यामुळे अंबाजोगाईतील तरुणाईत नाराजीचा सूर उमटत आहे.

केज मतदारसंघात उद्योगधंद्यांच्या संधी निर्माण व्हाव्यात, स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी ‘एमआयडीसी’ ची आवश्यकता असल्याचं वारंवार सांगितलं जात असलं तरी ठोस पावलं उचलली जात नाहीत. आता बीडमध्ये ‘एमआयडीसी’ उभारणीच्या हालचालींना गती मिळाल्यानंतर अंबाजोगाईकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं, अशी मागणी होत आहे.

आश्वासनांचा विसर : अंबाजोगाईत ‘एमआयडीसी’ चा विषय धूळखात

अंबाजोगाईत ‘एमआयडीसी’ उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असताना, आजतागायत ठोस पावले उचलली गेली नाहीत. विशेष म्हणजे, आमदार नमिता मुंदडा आणि आमदार रोहित पवार यांनी निवडणूक प्रचारात अंबाजोगाईत ‘एमआयडीसी’ उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका संपताच या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसत आहे.

निवडणुकीच्या काळात तरुणांच्या उत्साहाला आणि अपेक्षांना पाठीशी घालण्यासाठी दिलेली आश्वासनं आता फोल ठरल्याने तरुणांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. बीड जिल्ह्यात 1 हजार एकरवर ‘एमआयडीसी’ उभारण्याच्या हालचालींना वेग आला असला तरी अंबाजोगाईतील मागणी मात्र नेहमीप्रमाणेच धुळखात पडली आहे.