टीम AM : एका आईसाठी सर्वात मोठा अभिमान म्हणजे स्वतःच्या लेकराने आयुष्यात उंच भरारी घेणं. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानी ही अशीच उंच भरारी घेणारी पायलट आहे.
लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करून दाखवायचं या जिद्दीने ईशानीने अभिनयाचा मार्ग न निवडता पायलट होण्याचा निर्णय घेतला. तिच्या अविरत मेहनतीमुळे आणि अभ्यासामुळे तिला 2015 मध्ये पायलट लायसन्स मिळालं. आयुष्यातील आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे 2022 मध्ये दिल्लीतील निशांत वालिया सोबत झालेलं लग्न.
काही महिन्यांपूर्वी अलका कुबल यांना आपल्या मुलीच्या विमानात प्रवास करण्याची संधी मिळाली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. एक आई म्हणून तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमानाचा क्षण ठरला.
ईशानीचं हे यश केवळ तिच्या आईसाठी नव्हे, तर सर्वच मुलींसाठी प्रेरणादायी आहे. स्वप्न कितीही मोठं असलं तरी मेहनत आणि जिद्द असेल तर आकाशही आपल्या पायाशी झुकतं, हे ईशानीने आपल्या यशातून सिद्ध केलं आहे.



