अजित पवारांची मदतीची घोषणा : अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मिळणार मदत, वाचा…

टीम AM : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्याचा दौरा केला. या अतिवृष्टीने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर आल्याने शेळ्या-मेंढ्या आणि वासरे वाहून गेली आहेत. अनेक रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. आता या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.

अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा केली. या संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्यांच्या घरात पावसाने जास्त नुकसान झाले आहे. त्यांना आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. तात्काळ पाच हजार रुपये रोख आणि काही धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे, असे अजित पवार म्हणाले.

हवामान खात्याने पुढील काळातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करणे हेच आमचे धोरण आहे. कोणीही गैरसमज पसरवून राजकारण करू नये. तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार करायला हवा. शासन तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल,’ असे आश्वासनही पवार यांनी ‌यावेळी  दिले.