टीम AM : बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा – पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. एकीकडे पावसाचे पाणी तर दुसरीकडे धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग त्यामुळे डोंगर पट्टा व नदीकाठच्या पिकांचे, शेतीचे, घरांचे, पशुधनाचे, पाळीव प्राणी, अनेकांच्या जिविताचे, शेतीपूरक साहित्य, राहती घरे, विहिरी, सोलार पॅनल, सोलार पंप, रस्ते, पुल, पाझर तलाव, साठवण तलाव यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही गावांचा संपर्कही तुटला आहे. अनेक गावांत घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. अपरिमित हानी झाल्यामुळे नागरिक, शेतकरी हवालदिल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात गावोगावी जाऊन नागरिक, शेतकऱ्यांना दिलासा दिला. तहसीलदार, महसूल, कृषी अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून सरसकट पंचनामे करण्याची विनंती करून शेत जमीन खरवडली, पिके वाहून गेली, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.
बुधवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव, धानोरा खुर्द, तटबोरगाव, अंजनपूर, कोपरा, देवळा, आपेगाव आदी गावांतील पूरपरस्थिती जाणून घेतली. अनेक ठिकाणी स्वतः चिखल तुडवत पाण्याच्या प्रवाहातून पायी चालत पाहणी केली. तसेच मंगळवारी परळी तालुक्यातील आणि डोंगर पट्ट्यातील गावोगावी जाऊन भेटी दिल्या, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह तरूण, मुलांशीही संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या पाहणी वेळी देशमुख यांनी अनेकांच्या शेतातील बांध फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आहे.
मांजरा, जायकवाडी सारखी मोठी धरणे भरल्याने सतत दरवाजे उघडण्यात आले, अतिवृष्टीमुळे पाझर तलाव व साठवण तलाव भरून फुटले, नद्यांनी पातळी सोडून त्या पात्राबाहेर पडल्यामुळे ते पाणी शेतांमध्ये शिरले. उभी पिके वाहून गेली, शेत जमीनीची माती खरवडून गेली आहे. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा नदी काठावरील देवळा, अकोला, तडोळा, धानोरा (खुर्द), तटबोरगाव, माकेगाव, आपेगाव, अंजनपूर, कोपरा, बनसारोळा आदी गावांतील सरसकट पंचनामे करून यातून कोणालाही न वगळण्याची विनंती त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली आहे. ही परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, आर्थिक मदत करावी, अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते मदनलाल परदेशी, अच्युत ढगे, प्रविण देशमुख, केशव नाना ढगे, प्रविण पापा सोमवंशी, दिलीप ढगे, अतुल देशमुख, अस्लम भाई, डॉ. अजय ठोंबरे, बाळासाहेब ढगे, शिवनारायण ढगे, मुस्तफा सय्यद, ताहेर पठाण हे पाहणी वेळी उपस्थित होते.



