टीम AM : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 1 हजार 339 कोटी 49 लाख रुपये निधी वितरीत करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावं यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते. केंद्र शासनानं विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनानं अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणं, समुद्राला उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचं धोरण निश्चित केलं आहे.
अमरावती विभागासाठी 565 कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 721 कोटी तसंच उर्वरित रक्कम इतर विभागासाठी निधी वितरीत करण्यात येईल. डी.बी.टी. पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यात येणार आहे. चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील शेतीपिकांचे पंचनामे झाल्यानंतर तातडीनं मदत करण्यात येईल.



