अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा : रस्ते वाहून गेले, गावांचा संपर्क तुटला, जनतेकडे आमदारांचे दुर्लक्ष

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे संपूर्ण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. निसर्गाच्या या तडाख्यामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाच्या अडचणींसह अन्नधान्य, वैद्यकीय सेवा व आवश्यक सोयीसुविधांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.

दरम्यान, या संकटाच्या काळात केज मतदारसंघाच्या आमदार अजूनही परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष न देता केवळ निवेदनं देणे आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यापुरतेच मर्यादित राहिल्याची तीव्र नाराजी जनतेत व्यक्त होत आहे. ‘आमदार फक्त सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी निवडून आले आहेत का ? की खरोखर जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी थेट आमदारांना जाब विचारला आहे. ‘आम्हाला मदत कोण करणार ? अडकलेल्या गावांपर्यंत सोयीसुविधा कोण पोचवणार ? वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि बंद पडलेल्या दळणवळणाची सोय तातडीने कोण करणार ? असे प्रश्न उभे राहिले आहेत.

पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या भीषण परिस्थितीत अजूनही मदत न मिळाल्याने ग्रामस्थ अधिकच अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेत संतापाची लाट उसळली असून, प्रशासनासोबतच निवडून दिलेल्या आमदारांनी तातडीने परिस्थितीला सामोरे जाऊन मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. जनतेने दाखवलेला रोष आणि सवाल हे सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत.