टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
राक्षसवाडी व केकाणवाडी परिसरातील पाझरतलाव पावसाच्या पाण्याने फुगून फुटल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन, कापूस, मका यांसह खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखों रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. अंबाजोगाई – मांडवा पठाण मार्गावरील वान नदीला आलेल्या पूरामुळे पुलावरून पाणी वाहू लागले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील काही ठिकाणी लहान मोठे पूल वाहून गेले असल्याने गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
दरम्यान, मांजरा प्रकल्पाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सहा दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अनावश्यक बाहेर पडू नये, नदीकाठाला जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस व महसूल विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे.
अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट..
अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी, चिचखंडी येथे पाझर तलाव फुटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार विलास तरंगे यांनी भेट दिली. महसूल व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावाची पाहणी करून ग्रामाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.



