टीम AM : सत्तरच्या दशकात प्रसिद्ध लेखक मनू भंडारी यांच्या कथेवर आधारित आणि बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ सिनेमाने त्यावेळेच्या प्रचलित समाजव्यवस्थेला धक्का दिला. त्या काळी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा बोलबाला होता. मात्र ‘रजनीगंधा’ च्या माध्यमातून अमोल पालेकर नावाचा ‘कॉमन मॅन’ चा नायक हिंदी चित्रपट सृष्टीला मिळाला. बासूंच्या ‘रजनीगंधा’ ची निर्मिती आजच्या दिवशीच झाली असून पाच दशकानंतरही तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
13 सप्टेंबर 1974 मध्ये प्रदर्शित झालेला ‘रजनीगंधा’ सिनेमा खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीतील गेम चेंजर ठरला. साडेसात लाखांच्या बजेटमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत तयार झालेल्या या सिनेमाने पारंपरिक नायक – नायिकेची व्याख्या बदलवून टाकली. ‘रजनीगंधा’ ची नायिका, दीपा ही स्वतंत्र विचाराची, ‘पीएचडी’ करणारी मुलगी आहे. पहिल्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती दुसऱ्याच्या प्रेमात पडते. काही वर्षांनंतर नोकरीच्या निमित्ताने पहिल्या प्रियकरासोबत तिची भेट होते. त्या वेळी जोडीदार म्हणून नक्की कुणाची निवड करावी, याची घालमेल तिच्या मनात सुरू होते.
‘रजनीगंधा’ च्या नायकासाठी बासू चॅटर्जी यांची पहिली पसंती अमिताभ बच्चन होती; पण प्रत्यक्षात अमोल पालेकर यांची निवड झाली. नायिकेच्या भूमिकेसाठी शर्मिला टागोर, अपर्णा सेन, मल्लिका साराभाई यांचा विचार झाला; मात्र काही कारणामुळे नवा, फ्रेश चेहरा असलेल्या विद्या सिन्हा यांची निवड झाली. 50 वर्षांनंतर मागे वळून बघताना ‘रजनीगंधा’च्या यशात माझे फारसे कर्तृत्व नव्हते, असे चित्रपटात नायक असलेले ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी बोलताना सांगितले होते. बासूंच्या दिग्दर्शनाची, प्रत्येक व्यक्तिरेखेची, संगीताची ती कमाल होती. आजच्या पिढीने तो काळ किती वैविध्यपूर्ण होता, हे समजण्यासाठी तरी हा चित्रपट बघितला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाच्या नावावरून ‘रजनीगंधा’ कलात्मक सिनेमा वाटत होता. सिनेमातील स्टारकास्ट फ्रेश होती आणि चित्रपटात केवळ दोन गाणी होती. त्यामुळे सिल्व्हर ज्युबिली ठरलेल्या ‘रजनीगंधा’ चे वितरण करण्यास सुरुवातीला एकही वितरक तयार नव्हता; पण अनेक अडथळ्यांनंतर प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील सलील चौधरी यांच्या संगीताने धमाल केली. ‘रजनीगंधा फूल तुम्हारे हे’ या लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याने ‘बिनाका गीतमाले’त कित्येक आठवडे पहिले पायदान सोडले नाही. ‘कई बार यू ही देखा है’ या गाण्यासाठी मुकेश यांना एकुलता एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.



