टीम AM : अंबाजोगाईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे सूर्यदर्शनही झालेले नाही. अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे नदी – नाले तुडुंब भरून वाहू लागले असून परिसरात पाण्याचे साम्राज्य पसरले आहे.
अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिके पाण्याखाली गेली आहेत. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या गावांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



