नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत : खासदार बजरंग सोनवणे
टीम AM : राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाशी निगडीत वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून, 65 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरच्या 10, धाराशिव 11, बीड 17 तर नांदेड जिल्ह्यातल्या 27 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळामध्ये पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असं पत्र खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं, तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी बिंदुसरा नदी परिसराची पाहणी करत, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
21 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस
राज्यात आजपासून 21 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह अधूनमधून 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.



