मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले : अंबाजोगाईकर म्हणतात ‘आम्हाला काय फायदा ?’, वाचा…

टीम AM : धनेगाव येथील मांजरा धरण आज पूर्ण क्षमतेकडे पोहोचले. सततच्या पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढल्याने प्रशासनाने तातडीने चार दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मांजरा धरणातून पाणी सोडले जात असले तरी गेल्या ‌कित्येक वर्षांपासून अंबाजोगाई शहराला नियमित पाणीपुरवठा मात्र होत नाही. सध्या आठवड्यातून केवळ एकदाच नळांना पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातही‌ धनेगाव ‌येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला तर किमान ‌दहा ते बारा दिवसाला पाणी पुरवठा होतो. त्यामुळे मांजरा धरण भरले आणि पाणी सोडले, तरी अंबाजोगाईकरांना त्याचा काहीही फायदा होत नाही, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावरही शहरातील नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे. ‘आमचं धरण भरलं, पाणी नदीत सोडलं जातं… पण नळ कोरडेच. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवणार कोण ? असा सवाल अंबाजोगाईकरांनी लोकप्रतिनिधींना केला आहे.

दरम्यान, मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात उतरू नये, शेतीजवळ काळजी घ्यावी, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.