अंबाजोगाईत संततधार पाऊस : शेतातील कामे ठप्प, वाचा… 

टीम AM : अंबाजोगाईत पावसाने गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. सतत रिमझीम पावसामुळे गेल्या दोन दिवसापांसून ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. त्यातच कालपासून पावसाचा जोर आणखी वाढला असून आज शनिवार रोजी संततधार सुरुच आहे. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली तर काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अंबाजोगाईत 14 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या सरी कमी – अधिक प्रमाणात सुरूच आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवरील रोगराईला आमंत्रण देत आहे.

अंबाजोगाईत काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. त्यातच पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. अंबाजोगाई शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.