टीम AM : नागपूर ते गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 92 गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकल्पासाठी 86,300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. सध्या कोल्हापूर वगळता 11 जिल्ह्यांतील 309 गावांत मोजणी सुरू आहे. ऑगस्टपर्यंत मोजणी पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य सरकारचा ‘शक्तिपीठ’ महामार्ग हा महत्वकांक्षी प्रकल्प असून हा महामार्ग अंबाजोगाईतून जाणार आहे.
‘ही’ देवस्थाने जोडली जाणार
केळझरचा गणपती, कळंबचा गणपती, सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड शक्तीपीठ, तख्त सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगलीतील औदुंबर दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा यांचे समाधिस्थान आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत.