टीम AM : अंबाजोगाईत जनतेच्या मागण्यांसाठी शहर विकास संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज दिनांक 27 जून रोजी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा मार्गस्थ होत नगरपरिषदेवर धडकला. मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, नगरपरिषद कार्यालयाच्या गेटवर काही काळ पोलीस आणि मोर्चेकऱ्यांत तणाव निर्माण झाला होता. नंतर समन्वयातून मार्ग काढत मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रियांका टोंगे यांना निवेदन देत अंबाजोगाई शहरातील अनेक समस्या त्यांच्या समोर मांडल्या.
शहर विकास संघर्ष समितीच्या वतीने नागरी सुविधा, घरकुले, भोगवटा मालमत्ता मालकी हक्कांत घेणे व इतर गंभीर समस्यांची सोडवणूक करा यासह एकूण सहा मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
नगरपरिषदेच्या मिटींग हॉलमध्ये मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे व अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. बब्रुवाहन पोटभरे, भिमशक्ती संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, हमीद चौधरी, यशोधन लोमटे, लोकजनशक्ती पार्टी युवाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष असेफोद्दीन खतीब, अभिजीत लोमटे ॲड. इस्माईल गवळी, विनोद शिंदे, बाबा शेख, प्रेम माने, मनिष आदमाने, संतोष पारधे, विशाल पोटभरे यांच्यासह आदींनी सहभाग घेतला.