टीम AM : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून 700 रुपयांचे शेअर्स आणि 100 रुपये सभासद शुल्क घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्या पतसंस्थेच्या सदस्य बनतील. सदस्य झाल्यानंतर त्या महिला आपली रक्कम सुरक्षितपणे जमा करून स्वतःच्या गरजेनुसार कर्जरूपाने खेळते भांडवल मिळवू शकतील.
अनेक महिलांना बँकेत खाते काढणे, कर्ज मिळविणे अथवा व्यवसाय सुरू करताना आर्थिक नियोजन करणे कठीण जाते. त्यांच्यासाठी ‘लाडकी बहीण’ पतसंस्था एक विश्वासार्ह आणि सहजसोपे व्यासपीठ ठरणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना केवळ बचतच नव्हे, तर स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, असे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
बीड जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ पतसंस्था बाबत प्रक्रिया सुरू केली आहे. या पतसंस्थेत केवळ लाडकी बहीण योजनेतीलच नाही तर महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटातील विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि दिव्यांग महिलांनाही सामावून घेतले जाणार आहे. महिलांची बचतीची सवय वाढावी व त्यांना व्यवसायासाठी त्वरित कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध व्हावे, यावर भर दिला जाणार असल्याचेही जगताप यांनी कळविले आहे.