टीम AM : करिश्मा कपूरने 90 च्या दशकात आपल्या निळ्या डोळ्यांनी, निरागस लूकने आणि गोड हास्याने सर्वांना वेड लावले होते. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या करिश्मा कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आजही जेव्हा तिचे ‘दिल तो पागल है’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘अंदाज अपना अपना’ किंवा ‘हम साथ साथ हैं’ सारखे चित्रपट टीव्हीवर लागतात तेव्हा लोक ते मोठ्या उत्सुकतेने पाहतात. 25 जून 1974 रोजी जन्मलेली करिश्मा कपूर तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे.
करिश्माच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि एकूण संपत्तीबद्दल अनेकांना माहिती आहे, पण सर्वांची आवडती करिश्मा कपूरला ‘लोलो’ हे नाव कसे मिळाले, याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
अभिनेत्रीला चाहते ‘करिश्मा’ म्हणून ओळखतात, परंतु तिचे कुटुंब तसेच इंडस्ट्रीमध्ये तिला प्रेमाने ‘लोलो’ म्हणतात. करिश्माला ‘लोलो’ हे नाव कसे मिळाले ते जाणून घेऊ. करिश्मा कपूरची आई बबिता कपूर हॉलिवूड अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांची मोठी चाहती आहे. तिच्यापासून प्रेरित होऊन तिने आपली मोठी मुलगी करिश्मा कपूरला ‘लोलो’ हे टोपणनाव दिले.
करिश्मा कपूरने इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी तिचे शिक्षण सोडलेच पण त्यासोबत तिने तिच्या कुटुंबाविरुद्ध जाऊन अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. वृत्तांनुसार, कपूर कुटुंबात मुलींनी इंडस्ट्रीत काम करण्याची परंपरा नव्हती.
पण आई बबिताच्या पाठिंब्याने, करिश्माने इंडस्ट्रीत पदार्पण केले आणि तिने इंडस्ट्रीत स्वतःला सिद्धही केले. करिश्मा कपूरने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला. पण या चित्रपटानंतर तिने अनेक फ्लॉप चित्रपट दिले. 1996 मध्ये आलेला ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट करिश्मा कपूरच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरला. करिश्माने बरेच सिनेमे केले पण लग्नानंतर ती सिनेक्षेत्रापासून थोडी दुरावली. आता ती वेगवेगळ्या रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत असते.
सध्या करिश्मा तिच्या एक्स नवऱ्याच्या निधनामुळे चर्चेत आहे. 12 जून रोजी करिश्माचा एक्स नवरा संजय कपूरचे निधन झाले. तिने आपल्या मुलांसह त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली होती.