टीम AM : राज्य सरकारने ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. मंगळवारी (ता. 24) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या महत्वाच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. कोणताही प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. राज्य सरकारचा ‘शक्तिपीठ’ महामार्ग हा महत्वकांक्षी प्रकल्प असून हा महामार्ग अंबाजोगाईतून जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.
‘ही’ देवस्थाने जोडली जाणार
केळझरचा गणपती, कळंबचा गणपती, सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड शक्तीपीठ, तख्त सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगलीतील औदुंबर दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा यांचे समाधिस्थान आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत.



