जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शेतात केली सोयाबीन पेरणी

टीम AM : बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी खंडाळा (ता. बीड) येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात उतरून चाड्यावर मुठ धरत सोयाबीन पेरणी केली.

पावसाळा सुरू होताच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असून, त्यांच्या या मेहनतीला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतमळ्यात उतरून सोयाबीनच्या बियाणांची मुठ धरून पेरणी केली.

यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी विभागाच्या वतीने योग्य बियाणे, खतांचा पुरवठा व सल्ला वेळेत मिळावा, यासाठीही सूचना देण्यात आल्या. यानंतर खंडाळा गावाची पाहणी केली व नंतर ‘महावितरण’ च्या विद्युत पोलची व गावातील विद्युत तारा याची देखील पाहणी केली.