मोदींनी दिले निवेदन : नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांना मिळणार दोन महिन्यांचे वेतन, वाचा… 

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांना दोन महिन्यांचे वेतन उद्याच मिळणार असल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कंत्राटी स्वच्छता कामगारांच्या थकीत वेतनासंदर्भात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यशस्वी शिष्टाई केली. मुख्याधिकारी डॉ. प्रियंका टोंगे यांनी देखील हा प्रश्न गांभीर्याने घेत कामगारांचे थकीत वेतन देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. ‘पीएफ’ आणि एक महिन्याचे थकीत वेतन लवकरचं अदा केले जाईल, असे आश्वासन देखील डॉ. टोंगे यांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे. 

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी ‘कामबंद’ आंदोलन सुरु केले होते. या ‘कामबंद’ आंदोलनामुळे गेल्या तीन – चार दिवसांपासून शहरात स्वच्छतेचे तीन – तेरा वाजत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. नियमित स्वच्छता न झाल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले होते. दुसरीकडे जोपर्यंत थकित वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत ‘कामबंद’ आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला होता. परंतू, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज मुख्याधिकारी डॉ. टोंगे यांची भेट घेतली आणि शहरातील स्वच्छतेचा, कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न उपस्थित केला. यावर डॉ. टोंगे यांनी सकारात्मकता दाखवीत लागलीच कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे थकीत वेतन उद्या देण्याचे आश्वासन माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. प्रियंका टोंगे यांना दिले. शिष्टमंडळात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.