टीम AM : अंबाजोगाई – आडस रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेली एर्टिगा कार दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात काल सांयकाळी उमराई जवळ झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, माजलगाव तालुक्यातील पात्रुड गावातील एक कुटुंब एर्टिगा कारने (क्रमांक – एमएच 05 सीव्ही 9186) अंबाजोगाई येथे लग्न समारंभासाठी येत होते. सदरिल कार अंबाजोगाई – आडस रस्त्यावरील उमराई पाटी जवळ आली असता दत्त मंदिरासमोर अचानक एक दुचाकीस्वार कारसमोर आल्याने चालकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केला. यात मात्र त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील एहेते शामुल हक्क जागीरदार (वय – 50) शौकत अहमद शेख (वय – 46) आणि चालक खय्युम अब्बास अत्तर (वय – 45) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.