टीम AM : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारने राज्यातील सुमारे 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.
मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनीही महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत, महाराष्ट्र सरकारने आता राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन निर्णयानुसार, राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर 55 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता मिळत होता, ज्यामध्ये आता दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
शासन निर्णय जारी
राज्य शासनाच्या वित्त विभागाने 15 मे 2025 रोजी याबाबत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागील चार महिन्यांच्या महागाई भत्त्याची फरकाची रक्कम जमा होणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे. याचा अर्थ त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांच्या महागाई भत्त्याचा फरक मिळणार आहे. मे महिन्याच्या पगारासोबत, जो त्यांना जून महिन्यात मिळेल, त्यात या वाढलेल्या महागाई भत्त्याचा आणि चार महिन्यांच्या फरकाचा लाभ प्रत्यक्ष रूपात मिळेल. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, अशी अपेक्षा आहे.