टीम AM : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत.
6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले होते. ‘चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या,’ असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठराविक वेळेत घ्या, उर्वरित वादाचे मुद्दे टाळा, असे निर्देशही कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे.
फेर प्रभाग रचना करण्याचे आदेश
राज्य निवडणूक आयोगाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा, असे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले.
तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना, तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.