जनसुरक्षा विधेयक मागे घ्या : जवळगाव येथील गायरानधारकांना जमिनी बहाल करा, अंबाजोगाईत निदर्शने

टीम AM : महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे तसेच जवळगाव येथील गायरानधारकांना जमिनी बहाल करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 22 एप्रिल रोजी आंबेडकरी व डाव्या पक्ष संघटनांनी जोरदार निदर्शने केली. या निदर्शनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही हक्कांची गळचेपी करणारे, ‘विशेष जनसुरक्षा विधेयक’ या नावाचे एक विधेयक महाराष्ट्र सरकारने आणले आहे. या विधेयकामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणे, उपोषण, धरणे, आंदोलन इ. करणे याचा अधिकारच आता बेकायदेशीर कृत्याच्या नावाखाली संपुष्टात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला संविधानाने दिलेला अधिकार आणि लोकशाहीच्या मूल्याचे हनन करणारे हे अन्यायकारक विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी आंबेडकरी व डाव्या पक्ष संघटनांनी आज आंदोलन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, अशोक पालके, भिमराव सरवदे, राजेश वाहुळे, अक्षय भुंबे, धिमंत राष्ट्रपाल, बाबा शेख यांच्यासह आदींच्या सह्या आहेत. 

करुणा मुंडेंची आंदोलनात उपस्थिती

जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे तसेच जवळगाव येथील गायरानधारकांना जमिनी बहाल करण्यात याव्यात, या मागणीसाठी अंबाजोगाई येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करुना मुंडे याही सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यावर जोरदार टीका करत जवळगाव येथील गायरानधारकांना पाठिंबा दिला. आपण या आंदोलनात गायरानधारकांच्या बाजूने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.